संविधान निर्मितीवर आधारित माहितीचित्रपटाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आयोजन
पुणे (हडपसर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे फिल्म क्लब अंतर्गत दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी “संविधान निर्मिती” या विषयावर आधारित माहितीपर चित्रपटाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी भूषविले. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या कॉमर्स सेमिनार हॉलमध्ये पार पडलेल्या या माहितीपर चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संविधान निर्मितीचा ऐतिहासिक प्रवास विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे उभा राहिला. यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “भारतीय राज्यघटनेचे पारायण झाले पाहिजे. संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून जीवनाला दिशा देणारी प्रेरणा आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे निभावले पाहिजे.” त्यांनी संविधानाविषयी जनजागृती करण्यावर विशेष भर दिला.
कार्यक्रमात राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राहुल नरंगळकर यांनी मनोगत व्यक्त करताना संविधान हे “माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे सामर्थ्यशाली साधन आहे” असे मत मांडले.
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा. काशिनाथ दिवटे, प्रा. ऋषिकेश साळुंखे, प्रा. श्रीकृष्ण थेटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनीषा जरक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी सोहम शितोळे यांनी मानले.
Comments
Post a Comment
प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावरना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद...